पुणे – हवेली, मुळशी, वेल्हा तालुक्यातील डोंगराळ तसेच पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या दुर्गम भागातील 16 शाळांमधील सुमारे 300 विद्यार्थांना पुण्यातील आशा प्रतिष्ठाणच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले. गेली दोन वर्षे ऑनलाईन शाळा असल्याने या मुलांना मोठया अडचणीचा सामना करावा लागला तर यंदाच्या वर्षी या भागात मोठया प्रमाणात पाऊस असल्याने मुलांना शाळेत जाताना भिजत जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठाणच्या वतीने हे रेनकोट वाटप करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत पाढारवाडी, पळसे, कलंबशेत वाड्या वस्ती, ताम्हिणी गाव आजूबाजूचे पाडे, लावर्डे, मुगाव दुधवन, गडले, कोलवडे मोसे या भागातील शालेय मुलांना हे रेनकोट देण्यात आले. यावेळी शाळांचे शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेच्या वतीने अध्यक्ष अंजली लोणकर यांच्यासह गणेश ठाकर, चंदन डाबी, संजय शिंदे, चंद्रकांत साने, सोपान यादव, किरण रेणुसे, प्रतीक डांगी अनुजा निकते, कुसुम शर्मा, पुरुषोत्तम डांगी यांनी या उपक्रमाचे नियोजन तसेच संयोजन केले.