पुणे जिल्हा: आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपलेलं दूध वाटप

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी संघटनांच्यावतीने उत्तर पुणे जिल्ह्यात आंदोलन

मंचर -आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपलेले दुधाच्या वाटपाच्या विरोधात स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, पुणे जिल्हा समितीच्या वतीने मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना एकाच वेळी विविध मागण्यांचे ई-मेल पाठवून आंदोलन करीत या प्रश्‍नावर सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी आंबेगाव-जुन्नर तालुक्‍यातील आदिवासी पट्ट्यात दगडाला दुधाचा अभिषेक करून निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध आदिवासी गावांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले.

स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत मागण्या मांडल्या असता त्यावर संबंधित ठेकेदारांची बिले काढली जाणार नाहीत आणि या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याचे आश्‍वासन यावेळी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

इ-मेल आंदोलनात म्हटले आहे की, आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपत आलेले दूध वाटप केले गेले होते. हे दूध वाटप करणारे प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करा, विद्यार्थ्यांची खरोखरच काळजी असेल तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, डीबीटी व स्वयंम योजनेची थकीत रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करा.

या आणि इतर मागण्यांसाठी आंबेगाव तालुक्‍यातील राजपूर, बोरघर, तेरुंगण, जांभोरी, डोन, तसेच जुन्नर तालुक्‍यातील जळवंडी, हातविज, तळमाची, खडकुंबे येथील वाड्यावस्त्यांवर व तालुक्‍याच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेत, नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी, युवक, युवतींनी हातात विविध मागण्यांचे पोस्टर्स घेऊन, दगडाला दुधाचा अभिषेक घालून, तसेच निषेधाचे पोस्टर्ससोशल माध्यमांवर पाठवून निषेध व्यक्त केला.

जांभोरी (ता. आंबेगाव) ःयेथे दगडाला दुधाचा अभिषेक करून आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपलेल्या दूध वाटपाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.