महाराष्ट्राचा ऋतुराज अजूनही बाधित

करोनाच्या बाधेने अद्याप विलगीकरणातच

दुबई – महाराष्ट्राचा रणजीपटू व चेन्नई सुपर किंग्ज संघाचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड अद्याप विलगीकरणातच असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी करण्यात आलेल्या चाचणीतही तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने त्याला आणखी काही दिवस विलगीकरणातच राहावे लागणार आहे.

त्याला करोनाची बाधा झाल्यानंतर उपचारांसाठी तसेच विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करण्यासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, तो लवकरच बरा होईल व संघाच्या सराव सत्रात सहभागी होईल, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.

दीपक चहरसह ऋतुराजलाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच चेन्नई संघातील सपोर्ट स्टाफमधील 11 जणही बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यातून ऋतुराज वगळता अन्य सर्व करोनातून मुक्‍त झाले व त्यांनी विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यावर कार्यरतदेखील झाले.

चहरने संघाच्या सराव सत्रात सहभागी होत स्पर्धेच्या सलामीच्या लढतीसाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी ऋतुराजबाबत विचारणा सुरू झाली होती. मात्र, आणखी काही दिवस तरी तो सराव सत्रात सहभागी होऊ शकत नाही, असे सांगण्यात येत आहे.

ऋतुराजची काल करण्यात आलेली करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नसून त्याची आणखी दोन दिवसांनी पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. तो लवकरच फिट होऊन सराव सत्रात सहभागी होईल, असा विश्‍वासही संघ व्यवस्थापनाने व्यक्‍त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.