सीरमच्या लसीची चाचणी पुण्यात दोन दिवसांत सुरू

भारती हॉस्पिटल, केईएम, ससूनमध्ये होणार : अतिरिक्‍त सतर्कता बाळगण्याची सूचना 

पुणे – सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या ऑक्‍सफर्डच्या कोव्हीशिल्ड या करोनावरील लसीच्या चाचणीवरील स्थगिती केंद्रीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) उठविल्यानंतर येत्या दोन दिवसांत पुण्यातील भारती हॉस्पिटल, केईएम आणि ससून रुग्णालयात याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी तिसऱ्या टप्प्यातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या चाचण्यांचा निकाल सकारात्मक आल्यास तसेच त्याचे दुष्परिणाम न घडल्यास लस उत्पादनाला हिरवा झेंडा मिळण्याची शक्‍यता आहे. 

सीरम इन्स्टिट्यूटने ऍस्ट्रेझेनका कंपनीसोबत “ऍस्ट्राझेन’ आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठासोबतची “कोव्हीशिल्ड’ लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या होत्या. चाचणीदरम्यान कोणत्या स्वयंसेवकाला कोणताही त्रास अथवा साईड इफेक्‍ट झाले नसल्याचे तज्ज्ञांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात सुरक्षितता तपासण्यानंतर पुढील चाचणी मान्यता मिळण्याची प्रतीक्षा होती. दरम्यान, “ऍस्ट्रेझेन’ या लसीच्या चाचणीदरम्यान परदेशात एका व्यक्तीला लक्षणे आल्याने ब्रिटिश कंपनीने चाचण्या थांबविल्या. त्यानंतर “सीरम’नेही देशातील चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला. तर “डीसीजीआय’ची परवानगी येत नाही, तोपर्यंत चाचण्या सुरू करणार नसल्याचे सीरमने स्पष्ट केले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या “ऍस्ट्राझेन’ लसीच्या मानवी चाचणीतील अडथळे दूर करण्यात आले. त्या लसीच्या चाचणीसाठी इंग्लंडच्या “मेडिसीन हेल्थ रेग्युलेटरी ऍथॉरिटी’ने (एमएचआरए) “ऍस्ट्राझेन’ला चाचणीसाठी परवानगी दिली. त्या परवानगीनंतर “सीरम’ला केंद्रीय औषध महानियंत्रक परवानगी कधी देणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर केंद्रीय औषध महानियंत्रकांनी मंगळवारी रात्री उशिरा “सीरम’ला चाचणीसाठी परवानगी दिली. त्यामुळे आता देशभरात सतरा केंद्रावर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे ढोस आल्यावर दोन दिवसांत चाचण्यांना सुरुवात होईल. आतापर्यंत 34 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. तर यापुढे टप्प्याटप्प्यात लस देण्यात येणार आहे.
– डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.