म्हसवड (प्रतिनिधी) – येथील माणदेशी फाउंडेशनतर्फे मुलींसाठी किकस्टार्ट गर्ल्स कार्यक्रमाअंतर्गत नियमित कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी 100 मुलींना भेटवस्तू म्हणून सायकलींचे वाटप करण्यात आले.
मुलींसाठी किकस्टार्ट गर्ल्स कार्यक्रम सप्टेंबर 2023 मध्ये अनघा कामत यांच्या संकल्पनेतून माणदेशी फाउंडेशन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम कंपनीतर्फे सुरू करण्यात आला. ह्या उपक्रमाचा कालावधी ६ महिन्याचा होता.
या कार्यक्रमात दर रविवारी माणदेशातील शेतकरी व कामगारांच्या मुलींची कार्यशाळा घेण्यात आली आणि त्यामध्ये आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता, बचत कशी करावी, आत्मविश्वास वाढवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
दर दोन महिन्यांनी मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी भेटवस्तू देण्यात आल्या. २९ मार्च रोजी मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुलींना भेटवस्तू म्हणून सायकलींचे वाटप करण्यात आले.
ईपीएसचे कुणाल मुखर्जी, माणदेशीच्या सर्वेसर्वा चेतना सिन्हा यांनी सर्व मुलींचे अभिनंदन केले. माण तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आहे. पण मुलींच्या कौशल्याचा दुष्काळ नाही याचा त्यांना अभिमान असल्याचे सिन्हा म्हणाल्या, आता यापुढेही माणदेशी फौंडेशन तरुण मुलांमुलींसाठी हा कार्यक्रम राबवणार आहे.