पारगाव, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पारगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगाव शाळेस ग्रामस्थांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारास उत्स्फूर्तपणे ८९ हजारांची देणगी दिली. ही देणगी विद्यार्थी हितासाठी वापरणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा गुंड यांनी दिली.
नानगावमध्ये नर्सरी व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये पोवाडा, लोकनृत्य, फनी डान्स, देशभक्तीपर गीते, नाटक, रिमिक्स गाणी व डोंबारी नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमास पालक व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी, नानगाव परिसरातील शिक्षकवृंद तसेच नानगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.