नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील विकासकामे व प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे. जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक शनिवारी (दि.26) नारायणगावात पार पडली, त्यावेळी आमदार बेनके बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे राज्य सरचिटणीस किशोर दांगट, जिल्हा बॅंकेचे संचालक व बाजार समितीचे सभापती संजय काळे, जि. प. सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, देवराम लांडे, सभापती विशाल तांबे,
जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास दरेकर, जिल्हा दूध संघाचे नवनिर्वाचित संचालक बाळासाहेब खिलारी, भाऊसाहेब देवाडे, युवक तालुकाध्यक्ष सूरज वाजगे, संजय गांधी “निराधार’चे अध्यक्ष अरुण पारखे, उज्ज्वला शेवाळे, महिला अध्यक्ष सुरेखा वेठेकर, युवती अध्यक्ष अक्षदा मांडे, जुन्नर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते फिरोझ पठाण, नगरसेवक भाऊ कुंभार, जुन्नर शहर महिला अध्यक्ष आरती ढोबळे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जुन्नर बिबट सफारी, शिवसंस्कार सृष्टी, यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प, चिल्हेवाडी पाईपलाईन, शिवनेरी लेण्याद्री रोपवे, क्रीडा संकुल, नारायणगाव उपजिल्हा रुग्णालय, ओतूर ग्रामीण रुग्णालय, हिवरे – उंब्रज पूल, आदिवासी भागातील रस्ते, हिरडा कारखाना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), जुन्नर नगरपरिषद, बंधारे, साकव पुलांसह विविध प्रकल्पांबाबतची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली.