नागपूर – विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रवीण दटके यांनी प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या उमेदवारीवरून नवीन वाद उपस्थित झाला आहे.
ही तक्रार नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे वकील सतीश उके यांनी दाखल केली आहे. दटके यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी विविध गुन्हे व संपत्तीची माहिती दिली. पण, 2006 मध्ये त्यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्याची माहिती त्यांनी दिली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रवीण दटके यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरूद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटला क्रमांक 321/2006 बद्दलची माहिती लपविली आहे. 7 वे संयुक्त नागरी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, नागपूर यांच्यासमोर खटल्याची माहिती देणे त्यांचे कर्तव्य होते. हे निवडणूक कायद्यांतर्गत चुकीचे प्रमाण आहे. दटके यांचा उमेदवारी अर्ज नाकारला जाऊ शकतो. प्रवीण दटके देखील कायद्यानुसार फौजदारी कारवाईस जबाबदार आहेत, असे उके यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा लोकप्रतिनिधींद्वारा विधानपरिषदेच्या 9 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या नऊ सदस्यांविरोधात कुणीही प्रतिस्पर्धी नसल्याने सर्वाचा विजय निश्चित आहे. भाजपकडून रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि माजी महापौर प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी विधानपरिषद सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला.