ओझर- अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेले श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहराचे मंदिर हे करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भाविकांना 17 मार्चपासूनच बंद ठेवले आहे. आज (दि. 11) संकष्टी चतुर्थी असली तरी नागरिकांसाठी दर्शन खुले करण्यात आले नाही. ओझर नगरीतही शांतता होती. येथे अत्यावश्यक सेवा सुरू असून वैद्यकीय सेवा, औषधांची आणि किराणा मालाची दुकाने सुरू आहेत.
गावात देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीमार्फत दिवसाआड फवारणी करण्यात येते. तसेच मंदिरातही दिवसातून एकदा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. येथील नेहमीच वर्दळ असलेले रस्ते, हॉटेल आदी ठिकाणी शुकशुकाट होता. करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वसामान्य लोक, भाविकांनी घराबाहेर न पडता आपल्या आरोग्याची काळजी घेत घरातच राहणे पसंत केले. घरीच सुरक्षित राहण्याबाबत विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत ओझर हे सातत्याने जनजागृती करीत आहेत.