#प्रभात_दीपोत्सव_२०२० : सूत्र नसलेले संचालक

– संजय कळमकर


कुठल्याही कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक निवडताना तो लयबद्ध आवाजाचा; परंतु मध्यम बुद्धीचा असावा, असे आमचे स्पष्ट मत आहे. मुलीला पाहायला जाताना नवऱ्या मुलापेक्षा बाकीच्यांनी बेंगरूळ दिसावे, असा एक अलिखित नियम आहे. तसे सभेच्या अलिखित नियमानुसार इतर पाहुण्यांपेक्षा सूत्रसंचालक वगैरे कमी पट्टीचे असावेत म्हणजे पाहुण्यांचा मान, सन्मान आणि बौद्धिक इज्जत टिकून राहते. 

आजकाल सभेमध्ये मात्र सूत्रसंचालकाला चांगला मान आणि धनही मिळत असल्याने अनेक हुशार मंडळी यास्थानी बसण्यास सरसावली आहेत. ती चांगलीच हुशार असल्याने दोन भाषणांच्या मध्ये स्वतःचे छोटेसे भाषण उरकून घेतात. सूत्रसंचालनात कुणाच्याही कवितेचे तुकडे, संतवचने, विनोद, दाखले, आठवणी सांगून, ते संचलन रंजक करण्याच्या प्रयत्नात भान हरपून जातात. सुरुवातीला एक-दोनदा श्रोत्यांना हा प्रकार सुखद वाटतो. परंतु प्रत्येक भाषणानंतर सूत्रसंचालकाचे असे प्रतिभाअविष्करण सभेला गुदमरून टाकते.

त्यातलीत्यात कवी संमेलनाचा सूत्रसंचालक नवकवी असणे फार धोकादायक. एका कवीची कविता झाल्यावर हा सूत्रसंचालककवी “अगदी याच विषयावर मी कालपरवाच एक ताजी कविता केली आहे.’ असे सांगून मूळ कवीपेक्षा लांबलचक कविता सुरू करतो. सारी सूत्रे त्याच्याच हातात असल्याने ती ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे संमेलनात वीस कवी असतील तर प्रत्येकाला एकच कविता म्हणण्याची संधी मिळते. सूत्रसंचालक मात्र आपल्या वीस कविता म्हणून घेतो. म्हणून कवींनी संमेलनात कवी म्हणून जाण्यापेक्षा नेहमी सूत्रसंचालक म्हणून जावे. म्हणजे त्यांना मनसोक्त कविता म्हणण्याचा आनंद मिळू शकेल. काही कवी मात्र झालेल्या कवितेवर दोन ओळीत भाष्य करून पुढच्या कवीला बोलावतात तेव्हा श्रोत्यांना हायसे वाटते. खरं म्हणजे कविसंमेलनाला कवींची संख्या अफाट असते. (हे मराठी साहित्याचे सुदैव म्हणावे तर, श्रोते कवींपेक्षा कमी असतात याला काय म्हणावे?) एका संमेलनात नवोदितांचे असेच एक भरगच्च कविसंमेलन ठेवण्यात आले होते. कवींची गर्दी तोबा होती.

कविता म्हणण्यासाठी आपला नंबर लागावा म्हणून कवींनी माझा नंबर घ्या, असा सूत्रसंचालकाभोवती गिल्ला केला होता. स्वतः सूत्रसंचालक उत्तम कवी होता. पण सूत्रसंचालन करताना आपण आपली कविता म्हणायला गेलो तर, नंबरला लागलेले कवी माईकच्या वायरने आपला गळा आवळतील अशी भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. शेवटी कवींची मजल त्याच्या हातातील यादीचा कागद हिसकावण्यापर्यंत गेली, तेव्हा मात्र तो चिडला. तेव्हढ्यात त्याला दूर मंडपात उभा असलेला एक पोलीस दिसला. कविसंमेलनात पोलिसाचे काय काम अशी शंकादेखील त्याच्या मनात आली नाही. त्याने घाईघाई पोलिसाला हात करून मदतीला बोलावून घेतले. पोलीस लगबगीने आला आणि त्याने “चला मागे हटा, गर्दी करू नका’, असा खाकी दम देत कवींना शांत केले. सूत्रसंचालाकाचा श्‍वास मोकळा झाला.

“आता तुम्ही येथेच थांबा आणि मला संरक्षण द्या’, असे सूत्रसंचालक म्हणाला. कविसंमेलन सुरळीत सुरू झाले. पाच-सहा कवींच्या कविता संपल्यानंतर मात्र अस्वस्थ झालेला पोलीस, सूत्रसंचालकाच्या कानाशी लागून म्हणाला, “माझ्या बहिणीची कविता आधी घ्या. नाहीतर मी निघून जाईल. मी तिच्यासाठी इथं आलोय. नाहीतर तुमच्या कवी लोकांचा आम्हाला काय फायदा न तोटा’. 

यावर “तुम्ही शेवटपर्यंत येथेच थांबायचे’, या बोलीवर सूत्रसंचालकाने पोलिसाच्या बहिणीचे नाव कवितेसाठी पुकारले. साहित्यिक कार्यक्रमांपेक्षा राजकीय कार्यक्रमातील सूत्रसंचालकांची जातकुळी वेगळी असते. फार काही अलंकारिक बोलण्यापेक्षा व्यासपीठावर बसलेल्या सर्व छोट्या-मोठ्या पुढाऱ्यांची स्तुती करणे हे त्याचे प्रमुख सूत्र असते. त्या स्तुतीमुळे व्यासपीठ भलतेच सुखावून जाते. काही पुढाऱ्यांना तर स्वतःचे थोरपण सूत्रसंचालकाकडून समजते. एक धटिंगण पुढारी तर आपले दोनचार पंटर कायम सूत्रसंचालकाशेजारी बसवायचा. पुढारी भाषणाला उठण्याआधी ते सूत्रसंचालकाला, साहेबांना काय काय उपाध्या लावायच्या ते सांगायचे. भाग्यविधाते, कार्यसम्राट, गरिबांचे कैवारी, कार्यकुशल, निडर, तरणेबांड व्यक्तिमत्त्व, सामान्य जनतेचे दैवत, गळ्यातील ताईत वगैरे. यातील एखादी उपाधी विसरली तरी पंटर सूत्रसंचालकाला दम देऊन ती म्हणायला लावायचे. ते ऐकून इतकी महान व्यक्ती आपल्या परिसरात असल्याचे श्रोत्यांना पहिल्यांदाच समजायचे. साहेब असे बेरकी की, या साऱ्या उपाध्या लावून झाल्याशिवाय उठत नसत. ते उठल्यानंतर “हात्तीच्या… हे आहेत होय’ असे कुजबुज गर्दीत उमटे.

एकंदर राजकीय सभेत सूत्रसंचालन करणे हे मोठ्या कसरतीचे काम असते. प्रत्येक वक्ता भाषणाला उठताना त्याने भोगलेली पदे सूत्रसंचालकाला न चुकता सांगावी लागतात. अमुक हे 1965 साली ग्रामपंचायतीचे सरपंच होते, तमुक 72 च्या दुष्काळात सोसायटीचे चेअरमन होते. त्यावेळेस सोसायटी बुडता बुडता वाचली-गर्दीतील कुजबुज. अशा त्यांना स्वत:शिवाय कुणालाच न आठवणाऱ्या पदांचा उल्लेखही करावा लागतो.

सूत्रसंचालन ही कला आहे. ते थोडके आणि सहज करावे. लोकांच्या पचनी पडेल एव्हढीच पाहुण्यांची स्तुती करावी. पाहुण्यांनी त्यांचे परिचय पत्र चारपाणी दिले असले तरी त्याचा सारांश करून वाचवा. कारण त्या पत्रातील सर्वच गोष्टी खऱ्या असतीलच याचा भरवसा नसतो. काही सूत्रसंचालक तर पाहुण्यांच्या तोंडूनच त्यांचा परिचय वदवून घेतात. एका साहित्यिकांचा परिचय करून देताना सूत्रसंचालक म्हणाले, यांच्या खूप कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. नंतर त्याने मागे वळून लेखकालाच विचारले, “किती ओ?’

लेखक म्हणाले, “तेवीस’ सूत्रसंचालक म्हणाला, “श्रोत्यांनो ऐकलत… आजच्या पाहुण्यांकडे पाहून वाटत नाही पण त्यांनी स्वत: मनाने आतापर्यंत तेवीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या सर्व कादंबऱ्या खूप गाजल्या. त्यातील सर्वात जास्त गाजलेल्या कादंबऱ्यांची नावे ऐकायचीत तुम्हाला. सांगा ओ’

शेवटी लेखकच वैतागून म्हणाले, “मीच उठल्यावर माझा परिचय देईल.

तुम्ही बसा.’ आवाजात प्रचंड चढउतार केल्यावर सूत्रसंचालन बहारदार होते यावर काही सूत्रसंचालकांचा विश्‍वास असतो. आर्केष्ट्रा वगैरे कार्यक्रमात ते ठीक असते; परंतु साहित्यिक कार्यक्रमात पाहुणे उठताना अगदी ऐतिहासिक स्टायलीत “दिल ठाम के बैठो…’ आणि “आता आपल्यासमोर येतील…’ असल्या काहीतरी रहस्यभेद केल्यासारख्या घोषणा करू नयेत. “एव्हढेसे रोप लावियले दारी… त्याच वेलू गेला गगनावरी’ किंवा “आभाराचा भार कशाला’ वगैरे सुभाषिते सूत्रसंचालकांना नवीन वाटत असली तरी ती खुपदा ऐकून श्रोत्यांची पाठ झालेली असतात. सूत्रसंचालकाने सभेत फारच भडकपणा केला, तर काजुकरीत काजू कमी आणि करीच जास्त झाली असे सभेच्या बाबतीत घडू शकते.

खरं म्हणजे सभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुणातरी गंभीर चेहऱ्याच्या आणि खूप वेळ बसून राहील अशा व्यक्तीला अध्यक्ष केलेलेच असते. सूत्रसंचालकाने सभा ताब्यात घेण्याऐवजी ती सुसूत्रपणे चालेल एव्हढीच काळजी घेतली तरी पुरे…! जाता जाता एक गंमत आठवली… प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांना एकाने प्रश्‍न विचारला, “हे सूत्रसंचालक एव्हढे का बोलतात? तेव्हा त्यांनी मोठे मासलेवाईक उत्तर दिले…

“सूत्रसंचालक फार बोलतात कारण… सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम नसतात…!’
काही सूत्रसंचालकांकडे पाहून याची तंतोतंत प्रचिती येते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.