नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदीमुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये केंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात रोष उमटत आहे. याप्रकरणी केंद्र सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. यातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत.
आज पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होणार आहे. या आंदोलनाला खुद्द शरद पवार उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. यावेळी शरद पवार हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पवार यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान ‘महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा’ अशा पद्धतीचे बॅनर सध्या झळकत आहेत.
दरम्यान, केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय घेतला आहे. आधीच ऑगस्ट महिन्यात चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क व त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य लागू करून गेल्या चार, महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याचे काम केंद्र सरकारकडून केले गेले. तेव्हाही शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
या परिस्थितीत कांद्याची उपलब्धता कमी असताना निर्यातबंदीचे हत्यार उपसून केंद्र सरकार केवळ तत्कालीन परिस्थितीत कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान करीत आहे. निर्यातबंदी घातल्याने कांद्याच्या दरवाढीवर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे.