पुणे -शहराचा वाढता विस्तार, असंख्य वाहने आणि शहर परिसरातील अरूंद रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातच पुणेकरांना पावसाळ्याच्या कालावधीत सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्डे, खोदकाम, रखडलेल्या नालेसफाईमुळे रस्त्यावर पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. याचा जाब मात्र ऊन-पावसात काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांना विचारला जातो. ही बाब लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी शक्य असलेली रस्त्यावरील कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोलीस, महापालिका, पीएमपीएल, महामेट्रो, बांधकाम विभाग यंत्रणेची बैठक झाली. यामध्ये पोलीस आयुक्तांनी संबंधीत यंत्रणांचे कान टोचले. तुमच्या रखडलेल्या कामांची बोलणी आम्ही का खायची? असा सवालच त्यांनी केला.
पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने संबंधित विभागांची बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, महापालिका, पीएमपीएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात शहरात दरवर्षी रस्त्यात पाणी साचणे, सिग्नल यंत्रणा बंद पडण्याचे प्रकार घडतात. यातून सर्वच रस्त्यांवर तासन्तास वाहतूक कोंडी होते. शहरात यंदा अनेक ठिकाणी मेट्रो, उड्डाणपुलाची कामे होत आहेत, तेथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी यंत्रणेस संयुक्तपणे काम करणे गरजेचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सूचना देत पावसाळ्यात वाहतूक नियमनाकरीता मनपा, महामेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेला वार्डन पुरविण्याबाबत पालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वी ही कामे होणार..
उड्डाणपूल, मेट्रो काम सुरू असलेल्या ठिकाणी उपाययोजना
पीएमपीएल ब्रेकडाऊन बसेसवर उपाययोजना
वाहतूकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणार
समन्वयासाठी कंट्रोल रूम, व्हॉट्सऍप ग्रुप…
पावसाळ्याच्या कालावधीत अचानक मोठा पाऊस होऊन एखादी अपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात तसेच संबंधीत सर्व यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा, यासाठी सर्व विभागांच्या कार्यालयांमध्ये कंट्रोल रूम तयार करण्या येणार आहेत. तर, याठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी यांचा संयुक्त व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.