पुणे -पुणेकरांना गुरूवारी दिवसभरात “तीन ऋुतूं’चा अनुभव आला. शहरात दुपारी प्रचंड उकाडा तर सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या तर रात्री हवेत गारवा निर्माण होऊन थंडी पडली. दिवसभराच्या उकाड्याने पुणेकर हैराण झालेले असताना शहरातील उष्णतेचा पारा 40 अंशाच्या पुढे गेल्याची नोंद झाली. दि. 1 जून या दिवसाचे सर्वाधिक 40.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
अवघ्या 10 ते 15 दिवसांत मान्सूनचे आगमन होईल, असे असताना जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असल्याने दिवसभरात उन्हाच्या चटक्याने, उकाड्याने नागरिकांची लाहिलाही झालेली असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस कोसळल्याने उकाडा काहीसा कमी झाला तर सायंकाळी गारवा निर्माण होत रात्री थंडी सदृश्य वातावरण तयार झाले होते.
दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शहरातील तापमान 41 ते 42 अंशाच्या असपास राहील तर दिवसभर आकाश निरभ्र आणि सायंकाळी ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे. गतवर्षी याच कालावधीत शहरात मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे.
प्रमुख केंद्रांवरील तापमान
ढमढेरे 42.4, पुरंदर 42, वडगावशेरी आणि इंदापूर 41.9, कोरेगाव पार्क 41.8, शिरूर 41.3, मगरपट्टा 41.2, चिंचवड 40.8, आंबेगाव 40.4, शिवाजीनगर आणि हडपसर 40.1, बारामती आणि एनडीए 39.7, हवेली 39.6, पाषाण 38.3