इंदापूर – शहरातील शहा परिवाराच्या प्रसिद्ध असणाऱ्या खिलार गाई गोठ्यात गाईंना गोड घास भरवत, गाईंचे पूजन शहा परिवाराच्या रुचिरा अंगद शहा यांनी केले. मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी करण्यात आली.
रुचिरा शहा म्हणाल्या की, दिवाळीची सुरुवातच वसुबारस या मंगलमय सणाने होते. ग्रामीण व शहरी भागात खिलार गाईंचे संगोपन झाले पाहिजे. गाई व आई यामध्ये काहीही फरक नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी या सणाच्या निमित्ताने गाईचे यशस्वी संगोपन हा नवा संकल्प ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शहा परिवाराचे प्रमुख मुकुंद शहा, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, युवा उद्योजक अंगद शहा, शर्विल शहा यांसह शहा परिवारातील कुटुंबीय उपस्थित होते.