राजगुरूनगर: खेड आळंदी विधानसभा मतदार संघात राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील हे ३३ हजार २४२ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे सुरेश गोरे यांचा दारुण पराभव केला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना मोहिते भावुक झाले होते. माझी शेवटची निवडणूक आहे. शेवट गोड करा या मोहिते यांच्या आवाहनाला जनतेने साथ देत पुन्हा निवडून दिले याबद्दल मोहिते यांनी “जनतेचे उपकार कधीच फिटणार नाहीत”. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात अत्यंत चुरशीची ठरलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहितेपाटील -शिवसेनेचे सुरेश गोरे, अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत सुरेश नामदेव गोरे (शिवसेना), दिलीप दत्तात्रय मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नितीन अंबादास गवई (बसपा), हिरामण रघुनाथ कांबळे (वंचित बहुजन आघाडी), चेतन तुकाराम पाटील (हमारी अपनी पार्टी), सुबोध लक्ष्मण वाघमारे(बहुजन मुक्ती पार्टी), अतुल महादेव देशमुख (अपक्ष), अनिकेत मुरलीधर गोरे (अपक्ष), पांडुरंग महाराज शितोळे(अपक्ष) हे उमेदवार रिंगणात होते.
माझी हि शेवटची निवडणूक होती जनतेने शेवट गोड केला. २०१४ च्या निवडणुकीत अपयश आले. मात्र न खचता राजकारण सोडले नाही. जनतेची कामे करीत जिद्दीने उभा राहिलो. पुन्हा यावेळी जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. माझे नेतृत्व पुन्हा मान्य केले. मी त्या सर्वांचा खूप ऋणी आहे. जनतेचे अनंत उपकार माझ्यावर राहणार आहेत. या निवडणुकीत विरोधी दोन्ही उमेदवारांनी पैशाचा पाऊस पाडला. मात्र मतदार पैशाला बळी पडले नाहीत. माझ्यावर विश्वास टाकला आणि मला निवडून दिले हे सांगताना मोहिते खूप भावुक झाले होते.पाच वर्षात लोकांची सुखदुःखे पहिली नाहीत. विकास कामे केली नाहीत म्हणून जनतेने सुरेश गोरे यांना घरी पाठवले. आता यापुढील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या कार्यकर्त्याला पुढे आणून त्याच्या पाठीशी राहील.
-दिलीप मोहिते पाटील
गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी सुरु झाली. पहिल्याच फेरीतदिलीप मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली. पाचव्या फेरीत४ हजार ६९४ ची मोहिते यांनी अपक्ष उमेदवारासोबत लढत देत आघाडी घेतली. १० व्या फेरीत मोहिते पुढेच राहिले त्यांनी दहाव्या फेरीत ५ हजार १४६ मतांची आघाडी कायम ठेवली. १५ व्या फेरीत विद्यमान आमदार सुरेश गोरे हे तिस-या क्रमांकावर गेले.
अपक्ष उमेदवार अतुल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते यांच्यात चुरशीची लढत झाली. अतुल देशमुख यांच्या पेक्षा ७ हजार ५७० एवढ्या मतांनी पुढे गेले १७ व्या फेरीत अतुल देशमुख तिसऱ्या क्रमांकावर गेले तर सुरेश गोरे यांनी मुसंडी मारली, मात्र दिलीप मोहिते यांचे लीड त्यांना कमी करण्यात अपयश आले. या फेरीत मोहिते यांना १२ हजार ८५८ मतांनी आघाडी घेतली. २० व्या फेरीत मोहिते हेच आघाडीवर होते. ते २० हजार ७७५ मतांनी पुढे होते. २५ व्या फेरीनंतरही मोहितेच पुढे राहले तर अंतिम २८ व्या फेरीत दिलीप मोहिते ३३ हजार २४२ मतांनी विजयी झाले. एकूणच एक ते २८ फेऱयांमध्ये दिलीप मोहिते पाटील यांनाच आघाडी मिळत राहिल्याने त्यांनी शिवसेनेचा दारुण पराभव केला.
खेड आळंदी विधासभा मतदार संघातील उमेदवार व त्यांना पडलेली मते
- दिलीप दत्तात्रय मोहिते-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- (९६,८६६मते विजयी),
- सुरेश नामदेव गोरे -शिवसेना (६३,६२४ मते),
- अतुल महादेव देशमुख-अपक्ष(५३,८७४मते),
- नितीन अंबादास गवई-बसपा(८७२मते),
- हिरामण रघुनाथ कांबळे-वंचित बहुजन आघाडी(१,७४० मते),
- चेतन तुकाराम पाटील (४३७ पक्ष),
- सुबोध लक्ष्मण वाघमारे-अपक्ष(३५६मते),
- अनिकेत मुरलीधर गोरे-अपक्ष (५९२ मते),
- पांडुरंग महाराज शितोळे-अपक्ष(६४७ मते)
- नोटा – १,७१७ मते