नवी दिल्ली : छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाला. रायपूरमध्ये एक कॉमेडी व्हिडीओ शूट करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
दरम्यान, भीषण अपघातामुळे ‘दिल से बुरा लगता है भाई’ हा आवाज कायमचा बंद झाला. ट्रकच्या धडकेने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. देवराज पटेलचा ‘दिल से बुरा लगता है भाई’ हा डायलॉग देशभरात व्हायरल झाला होता. रायपूर येथे सोमवारी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. यानंतर छत्तीसगडमध्ये शोककळा पसरली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील ट्विट करून देवराज पटेल याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
“दिल से बुरा लगता है” से करोड़ों लोगों के बीच अपनी जगह बनाने वाले, हम सबको हंसाने वाले देवराज पटेल आज हमारे बीच से चले गए.
इस बाल उम्र में अद्भुत प्रतिभा की क्षति बहुत दुखदायी है.
ईश्वर उनके परिवार और चाहने वालों को यह दुःख सहने की शक्ति दे. ओम् शांति: pic.twitter.com/6kRMQ94o4v
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) June 26, 2023
“दिल से बुरा लगता है’ या शब्दांतून करोडो लोकांची मने जिंकणारा देवराज पटेल आज आपल्याला सोडून गेला. या तरुण वयात जीव गमावणे खूप दुःखदायक आहे. देव त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजच्या निधनावर शोक व्यक्त केला.
देवराज पटेल हा मूळचा महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होता. पण रायपूर जिल्ह्यात सतत व्हिडीओ शूटिंग सुरू असते म्हणून तो तिथेच असायचा. सोमवारी तो व्हिडीओ शूट करण्यासाठी गेला असता रस्ते अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो महासमुंद जिल्ह्यातील डाब पाली गावचा रहिवासी होता. संपूर्ण कुटुंबही गावातच राहते. वडील घनश्याम पटेल शेती करतात. देवराज पटेल याला एक भाऊ असून त्याचे नाव हेमंत पटेल आहे.