मंत्र्याचा आरोप; सोनिया गांधी यांना पाठवले पत्र
भोपाळ -मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पक्षाचेच ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या धोका असल्याचा खळबळजनक आरोप त्या राज्यातील एका मंत्र्याने केला आहे. त्यामुळे त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसमधील बेबनाव शिगेला पोहचल्याचे संकेत मिळत आहेत.
मध्यप्रदेशचे वनमंत्री उमंग सिंघार यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून दिग्विजय यांच्यावर निशाणा साधला आहे. दिग्विजय राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्या पत्रात करण्यात आला आहे. दिग्विजय विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री कमल नाथ आणि इतर मंत्र्यांना पत्रं पाठवत आहेत. त्याला सिंघार यांनी आक्षेप घेतला आहे. दिग्विजय यांचा शक्तिकेंद्र बनण्याचा प्रयत्न आहे. दिग्विजय यांच्या कृतींमुळे ते पडद्यामागूून सरकार चालवत असल्याची टीका करण्याची संधी विरोधी भाजपला मिळत आहे, असे सिंघार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशचे दुसरे मंत्री पी.सी.शर्मा यांनी पुढे येत दिग्विजय यांचे समर्थन केले आहे. माजी मुख्यमंत्री असणाऱ्या दिग्विजय यांच्याकडे जनता समस्या मांडते. ते त्या समस्या सरकारकडे पोहचवतात. त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पत्रं पाठवण्यात काहीच गैर नाही. नाथ हेच सरकार चालवत आहेत. त्यासाठी सर्व मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठिशी आहेत, अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली.