लंडन – करोना महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षांमध्ये डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे 16 वर्षापर्यंत कोणत्याही मुलावरील डिजिटल खर्चाची मर्यादा 41 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनाप्रमाणे लहान मुलगा जेव्हा सोळा वर्षांचा होईल तेव्हा त्याच्यावर मातापित्यांना तब्बल 41 लाख रुपये तंत्रज्ञानासाठी आणि डिजिटल व्यवहारांसाठी खर्च करावे लागणार आहेत.
गेल्या 2 वर्षापर्यंत या खर्चाची मर्यादा फक्त दहा हजार रुपये होती. मनीसुपरमार्केट या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार अनेक पालकांनी या करोना लॉकडाऊन काळामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल यंत्रणांचा वापर केला आहे. शाळेत जाणाऱ्या 2000 मुलांची माहिती घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या अहवालानुसार 77 टक्के पालकांना डिजिटल खर्च कसा करायचा याबाबत चिंता वाटत आहे. डिजिटल खर्चाव्यतिरिक्त पालकांना आपल्या मुलांवर कपडे जेवण पॉकेट मनी असा 16 लाख रुपयांचा वेगळा खर्च करावाच लागणार आहे.
महामारीच्या काळामध्ये अशा प्रकारे संपूर्ण यंत्रणाच बदलून गेल्याने अनेक पालकांवर हा शैक्षणिक खर्च कसा करायचा याबाबत दबाव वाढत चालला असल्याचा निष्कर्षही या संशोधनात काढण्यात आला आहे.