नवी दिल्ली – विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या जमाखर्चाचे जे आकडे सादर केले आहेत ते आता जनतेसाठी खुले झाले असून त्यातील माहितीनुसार सन 2019-20 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला एकूण 3623 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
त्यातील 2555 कोटी रूपये त्यांना इलेक्टरोल बॉंड द्वारे मिळाले आहेत. अन्य राजकीय पक्षांमध्ये इलेक्टरोल बॉंडद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 29 कोटी 25 लाख, तृणमुल कॉंग्रेस पक्षाला 100 कोटी 46 लाख, द्रमुक पक्षाला 45 कोटी, शिवसेनेला 41 कोटी आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाला 2 कोटी 11 लाख रूपयांचा निधी देणग्यांद्वारे मिळाला आहे.
भाजपने जो जमाखर्च त्यावर्षी दाखवला आहे त्यानुसार भाजपने एकूण 1651 कोटी रूपये खर्च केला आहे. त्यातील 1352 कोटी रूपयांचा खर्च लोकसभा निवडणूक काळातील प्रचारावर झाला आहे. भाजपने चारशे कोटी रूपये जाहीरातींवर खर्च केले आहेत. राजकीय पक्षांनी जाहीर केलेली ही माहिती निवडणूक आयोगाने लोकांसाठी जाहीर केली आहे.