मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा चर्चेत असते. मात्र, तिच्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचे काम आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत. ऋषभसोबत तिचे नाव नेहमीच जोडले जाते. इतकंच नाही तर अभिनेत्री कुठेही गेली तरी तिला अनेकदा ऋषभ पंतच्या नावावर प्रश्न विचारले जातात. नुकतेच पुन्हा एकदा असेच काहीसे घडल्याचं पाहायला मिळालं. मात्र यावेळी उर्वशीला आपला राग आवरता आला नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक रिपोर्टर उर्वशीला प्रश्न विचारताना दिसतो, पण प्रश्न ऋषभ पंतशी संबंधित आहे. या प्रश्नावर अभिनेत्री काहीशी नाराजी व्यक्त करते. रिपोर्टर अभिनेत्रीला विचारतो, ‘तू ऋषभ पंतच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली होतीस.. खूप पोस्ट केल्या होत्या..त्याचा काही रिप्लाय आला का?…’ रिपोर्टरचा प्रश्नही पूर्ण होत नाही तोच उर्वशी म्हणते, ‘तुला काय हवंय?’ यानंतर रिपोर्टर म्हणतो, ‘तुम्ही इंस्टाग्रामवर खूप पोस्ट केल्या होत्या, मला त्या संदर्भात एक प्रश्न आहे’. यावर उर्वशी म्हणाली, ‘तुम्हाला फक्त टीआरपी, टीआरपी, टीआरपी पाहिजे… आणि मी हे होऊ देणार नाही.’
काही महिन्यांपूर्वी क्रिकेटर ऋषभ पंतचा कार अपघात झाला यामध्ये तो चांगलाच जखमी झाला होता. यादरम्यान उर्वशीने केलेल्या तिच्या सोशल मीडिया पोस्टची बरीच चर्चा झाली होती. कधी उर्वशी रौतेलाने मुंबईतील ऍडमिट ऋषभ पंतच्या हॉस्पिटलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर कधी क्रिकेटरच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना करणारी पोस्ट शेअर केली. तिने पोस्टमध्ये क्रिकेटपटूचे नाव स्पष्टपणे घेतले नसले तरी, नेटकऱ्यांनी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टचा अर्थ पंतशी जोडला होता.
View this post on Instagram
उर्वशीचा हा व्हिडीओ देखील सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे अद्याप उर्वशी किंवा रिषभकडून याबाबत कधीही स्पष्ट मत व्यक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघेही जेव्हा मीडियासमोर येतात तेव्हा नेटकरी त्यांना याबाबत विचारताना दिसतात.आताही उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.