मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले होते. या अपघातानंतर सोशल मीडियावर अनेकांनी ऋषभ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना सुरु केल्याचे दिसून आले. सध्या ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रिकेटर रोहित शर्माने देखील पंतच्या तब्येतीबाबतचे अपडेट जाणून घेतल्याचे समजते.
ऋषभ पंतच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून डॉक्टर त्याला सध्या इतर कोणत्याही रुग्णालयात हलवण्याचा विचार करत नाहीत. एका इंग्रजी स्पोर्टस वृत्तानुसार, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलून त्याच्या तब्येतीची माहिती घेतली. यावेळी उपचार सकारात्मक पद्धतीने सुरु असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितल्याचे समोर आले आहे. रोहित सध्या त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत मालदीवमध्ये आहे.
बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असून त्याला इतरत्र हलवायचे की नाही याबाबत निर्णय घेतील. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा, बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनीही शनिवारी ऋषभ पंत आणि त्याच्या आईची मॅक्स हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.
कसा झाला अपघात नेमका
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली होती. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं होत.
पंतचा अपघात झाल्याची माहिती समोर येताच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासंदर्भात विशेष निर्देश दिले होते . उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना पंतच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. .तसेच वेळ पडल्यास त्याच्यासाठी एअर ऍम्ब्युलन्सचीही सेवा पुरवा असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं आहे.