पिंपरी, दि. 25 – पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी परदेशात शिक्षण, नोकरी आणि पर्यटनाला पसंती देत असल्याने परदेशी भरारी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पासपोर्ट मागणीच्याही संख्येत मोठी वाढ झाल्याने येथील टपाल कार्यालयात पासपोर्टसाठी सुमारे दोन ते अडीच महिने “वेटिंग’ करावे लागत आहे. त्यामुळे या कार्यालयातील सुविधा आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.
खराळवाडी येथील पीएफ पोस्ट कार्यालमध्ये 2 एप्रिल 2017 पासून पासपोर्ट काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी पासपोर्टसाठी नागरिकांना पुण्यात जावे लागत होते. मात्र, पिंपरीतच सुविधा झाल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळ, चाकण, हिंजवडी या भागातील नागरिकांचीही सोय झाली आहे. परंतु, पासपोर्टसाठी येणाऱ्या अर्जांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत निपटारा होत नाही. दिवसाला केवळ 65 ते 68 अपॉइंटमेंट पूर्ण होत आहेत. येथे काउंटरची संख्या कमी असल्याने नवीन पासपोर्टसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर नंबर येण्यासाठी तब्बल 60 ते 75 दिवस म्हणजेच जवळपास दोन ते अडीच महिने वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे पुढील कामेही अनेकदा खोळंबत आहेत.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पासपोर्ट काढण्यासाठी कार्यालयात किमान चार काउंटरची आवश्यकता आहे. अपुऱ्या काउंटरमुळे अनेकदा वेळेवर काम होत नाही. परिणामी वेळेवर पासपोर्ट मिळत नाही. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने आणि नागरिकांची पासपोर्टसाठीची मागणी पाहता दिवसाला किमान 300 अर्जावर सही होणे अपेक्षित आहे. मात्र, सद्या दिवसाला केवळ 65 ते 68 अर्जांचा निपटारा होत आहे.
पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा
www.passportindia.gov.in या पासपोर्टच्या वेबसाईडवर जाऊन अर्ज भरावा. यानंतर आपल्याला हवे असलेले कार्यालय निवडून फी भरावी. यानंतर आपल्याला कागदपत्रे सोबत घेऊन जाण्याची तारीख मिळते. त्या तारखेस जाऊन पुढील प्रक्रिया करावी लागते. मात्र, पिंपरी येथील टपाल कार्यालयात त्यासाठी सुमारे अडीच महिन्यांचे वेटिंग आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरीतील पीएफ कार्यालयात 2 एप्रिल 2017 मध्ये पासपोर्टची सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांचा त्यास प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला सुमारे 65 ते 68 अपॉइंटमेंट पूर्ण केल्या जातात. मात्र, नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने दोन ते अडीच महिन्यांचे वेटिंग आहे.
– के. एस. पारखी, जनसंपर्क अधिकारी, चिंचवड विभाग.