मंत्री असताना विकास केला नाही आता…

खासदार डॉ. कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटलांवर डागली तोफ

रेडा- कॉंग्रेस पक्षात राहून हर्षवर्धन पाटील यांनी 19 वर्ष मंत्रीपद भोगले, तरी देखील इंदापूर तालुक्‍याचा विकास करता आला नाही. इंदापूर सहकारी साखर कारखाना, इंदापूर अर्बन बॅंक, दूध संघ व्यवस्थित चालवता आले नाहीत, याचे आत्मचिंतन करावे. इतका कालावधी जर तुम्हाला तालुक्‍याचा विकास करता आला नाही. तर इथून पुढील काळात तुम्ही काय इंदापूर तालुक्‍याचा विकास करणार? असा सवाल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ निमगाव केतकी येथे आयोजित सभेत डॉ. खासदार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, प्रवीण माने, महारुद्र पाटील यांच्यासह तालुक्‍यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, इंदापूर तालुका शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बबनराव खराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना जाहीर पाठींबा यावेळी दिला. खराडे यांचा सन्मान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.

खासदार कोल्हे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही इंदापूरला शिवस्वराज्य यात्रा महाराजांच्या नावाने आणली. या यात्रेचा येथील विरोधी उमेदवाराला त्रास कशासाठी झाला याचे कारण अद्याप मला कळाले नाही. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या तालुक्‍यातून 70 हजार मतांची आघाडी दिली आघाडी खऱ्या अर्थाने आमच्या पक्षाचा ढाण्या वाघ आमदार दत्तात्रय भरणे असल्यामुळेच मिळाले आहे, त्यामुळे इतरांनी याचे श्रेय लाटू नये असा टोला खासदार कोल्हे यांनी लगावला.

  • आश्‍वासनांच्या खैरातीचे हे घ्या पुरावे -भरणे
    हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्‍याला मंत्री असताना पाणी देऊ शकले नाहीत ते आता काय पाणी देणार? निमगाव केतकीचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी याआधीही शब्द दिला होता त्याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. याची कात्रणे पुरावा म्हणून उपस्थित जनसमुदायाला दाखवून की खोटी आश्‍वासने देणार, असे सांगून आमदार भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र्र सोडले.

Leave A Reply

Your email address will not be published.