राहुरी : मोटरसायकलवर जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्याने जबरदस्तीने हिसकावून धूम ठोकली. धूमस्टाईलने झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमती संजय दिघे या महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून नोकरी करत असून त्या राहुरी खुर्द येथील राजेश्वरी कॉलनी येथे रहावयास आहेत. २१ मार्च रोजी दुपारी ३.४५ वाजे दरम्यान सुमती दिघे व त्यांचे पती संजय दिघे हे दोघे मोटारसायकलवरून राहुरी खुर्द येथून विद्यापीठकडे जात होते.
विद्यापीठ येथील पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यापैकी मागे बसलेल्या भामट्याने सुमती दिघे यांच्या गळयातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नगरच्या दिशेने धूम ठोकली. काही क्षणातच भामटे सुसाट वेगात निघून गेले. घटनेनंतर सुमती संजय दिघे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली .अज्ञात दोन आरोपी विरोधात रस्तालुटीचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.