धोनीच्या स्टंटवर नेटकऱ्यांचा जल्लोष

रांची – भारतीय संघाचा माजी कर्णधार व बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) तसेच अन्य स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा धोनीचा जलवा अनुभवायला मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वीच धोनी जिममध्ये तंदुरुस्तीसाठी जी मेहनत घेत आहे, त्यात त्याने केलेले स्टंट सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत व त्यावर विविध प्रतिक्रिया देत नेटकरी जल्लोष करत आहेत.

इंग्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला होता. या सामन्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी धोनी आयपीएल स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतत आहे. त्यापूर्वी त्याने येथील स्थानिक क्रिकेट संघासह सराव सुरु केला आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग संघासह पुढील आठवड्यापासून सरावदेखील करणार आहे. त्यापूर्वी तो तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत आहे.

चपळ हालचाल व्हावी यासाठी तो नवनवीन क्‍लृप्त्या करत असून असेच काही स्टंट करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पुन्हा एकदा धोनी.. धोनी.. चा गजर व लाइक्‍सच्या माध्यमातून चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या स्टंटच्या व्हिडिओमध्ये धोनी एका बॉक्‍सवर उडी घेतो तसेच विविध करामती करताना दिसत आहे. 38 व्या वर्षी धोनीचा फिटनेस पाहून चाहते आता त्याच्याकडून पुनरागमनानंतरच्या सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा फिनिशरची कामगिरी व्हावी ही अपेक्षा करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.