कोलकाता – खरगपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टरची दोन वर्षे नोकरी केली होती व ते ठिकाण कोलकातापासून केवळ दोन तासांवर आहे. या सामन्यासाठी जे प्रेक्षक मला प्रोत्साहन देण्यासाठी जमले आहेत, ते याच प्रवासाचा एक भाग आहेत. तूमचे सगळ्यांचे आभार व यापुढेही असेच प्रेम असू दे, अशा शब्दात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सामन्यानंतर ईडन गार्डन्सवर जमलेल्या हजारो चाहत्यांना धन्यवाद दिले.
चेन्नई व कोलकाता यांच्यात रविवारी याच मैदानावर झालेला उच्चांकी धावसंख्येचा सामना चेन्नईने जिंकला. हा सामना सुरु होण्यापूर्वी कोलकाताची जर्सी परिधान केलेले प्रेक्षक अत्यंत विरळच होते. तर चेन्नईची पिवळी जर्सी, हातात धोनीच्या नावाचे फलक व धोनीला उद्देशून थाला थाला व धोनी… धोनी… असा जयघोष सुरू झाला तो सामना संपला तरीही थांबला नाही.
अखेर धोनीने हातात माईक घेत चाहत्यांचे आभार मानले तेव्हा चाहत्यांची पाऊले मैदानाबाहेर जाताना दिसू लागली. या संपूर्ण प्रसंगामुळे कोलकाताचे प्रेक्षक व खेळाडू, बंगाल क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, चेन्नई संघातील धोनीचे सहकारी खेळाडू इतकेच काय तर समालोचकही काही क्षण आवाक झाले होते की सामना चेन्नईत आहे की कोलकातामध्ये हेच त्यांना उमगत नव्हते.
निरोप देण्याच्या सामन्याचे गंमतीदार वक्तव्य
धोनीने जेव्हा हाती माईक घेत बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याने हे सगळे चाहते मला निरोप देण्यासाठी आलेले आहेत, असे गंमतीने म्हटले होते. या चाहत्यांचा असा समज झाला असेल की हा माझा कोलकातातील आयपीएलचा अखेरचा सामना ठरेल. माझ्या निवृत्तीच्या घोषणेच्या अपेक्षेने त्यांनी मला या सामन्याद्वारे निरोपाची तयारी तर केली नव्हती ना, असे वक्तव्यही त्याने केले व त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.