भाजप नगरसेवकांचा विश्वास : धानोरी-टिंगरेनगर परिसरात पदयात्रा
पुणे – धानोरी आणि टिंगरेनगर भागातून महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्य देण्याचा विश्वास या भागातील महायुतीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
मुळीक यांच्या प्रचारार्थ धानोरी-टिंगरेनगर, विश्रांतवाडी चौक परिसर, धानोरी रोड परिसर, कुसमाडे वस्ती परिसर, म्हस्के वस्ती परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक जालिंदर कांबळे, माजी नगरसेविका नंदा कांबळे, मनसेचे सादिक शेख, अनिल राठोड आणि नितीन राठोड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
तसेच, मुळीक यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, नगरसेवक संजय भोसले, अनिल टिंगरे, फरजाना शेख, नाना सांगडे, ऐश्वर्या जाधव, आनंद गोयल, अशोक कांबळे, चंद्रकांत टिंगरे, किरण भालेराव, राजू साखरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुळीक यांच्या पदयात्रेचे मतदारांनी जल्लोषात स्वागत केले.
मुळीक म्हणाले की, धानोरी-टिंगरेनगरने भाजपला नेहमी साथ दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या प्रभागामधून भाजपला चांगले मतदान झाले होते. ज्या संख्येने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे सहज मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येणार अशी मला खात्री आहे,’ माझा विजय निश्चित आहे. विरोधक सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून खोट्या अफवा पसरवत आहे. मात्र, नागरिक या अफवांना थारा देणार नाहीत. वडगावशेरीचा विकास हेच एक ध्येय आहे. धानोरी-टिंगरे नगरभागात आणखी दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आपला भर राहणार असल्याचे मुळीक यांनी यावेळी मतदारांशी बोलताना स्पष्ट केले.