पारनेर – पारनेर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांची ढवळपुरी येथे जाहीर सभा झाली.
सक्षणा सलगर यांनी मोदी सरकार व फडणवीस सरकार वर खरखरीत टीका करत, जनतेला अंधारात ठेवून पंधरा वर्षे तालुक्याच्या नावाखाली स्वतःचा विकास करत, जनतेची दिशाभूल कशाप्रकारे केली, याचा पाढा वाचला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांची राजकीय कोंडी करण्यात येत आहे. पंचवीस वर्षे दोन घरांत आमदारकी असताना विकास करायला त्यांचे हात कोणी धरले होते का? शिवडोहचा साधा पाणी प्रश्नही सोडू शकले नाहीत, तर कोकणातील पाणी कसे आणणार, असा सवाल महानगर बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी सुजित झावरे व आमदार औटी यांना केला.
मी पदवीधर आहे. दहावी पास नाही. मी जनतेच्या प्रेमासाठी डीजेवर नाचत असलो, तरी झिंगाट गाण्यावर नाचत नाही. आपले वय काय, आपण करतोय काय, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका यावेळी लंके यांनी कुणाचेही नाव न घेता केली. माझ्या अवतारा वर जाऊ नका विकासाचा दृष्टिकोन माझ्याकडे आहे. आमदार कसा असतो हे मी दाखवून देईल, असे म्हणत लंके यांनी गबाळा या शब्दाला उत्तर देताना आमदार औटी यांना सुनावले. लंके निवडून आल्यावर तालुक्याचा बिहार करतील, अशी विरोधकांनी केले. त्यावर लंके म्हणाले होय मी तालुक्याचा बिहारच करणार आहे. त्यांना हे ही माहीत नाही की देशातील सर्वांत जास्त आयएएस, आयपीएस अधिकारी हे बिहारमध्येच घडले आहेत.
माझ्यावर अनेक गुन्हे आहेत, असे ते गांसतात. त्यातील बहुतांशी गुन्हे आमदार औटी यांच्या सांगण्या वरूनच माझ्यावर लागले आहे. माझ्या गरीब आजोबांचा सात-बारा उतारा देण्यासाठी पैसे मागितले त्याला मी जाब विचारला हा माझा गुन्हा आहे का? चार दिवस फक्त माझ्यासाठी कर्जरूपाने द्या. त्याची परतफेड मी पाच वर्षे तुमच्या सेवेत तुमच्या अडचणीत सहभाग नोंदवत व्याजासकट परत फेड करील, असे आवाहन यावेळी लंके यांनी केले. मंजूषाताई गुंड,अशोक सावंत, संजय भोर, उदयजी शेळके, मधुकरजी उचाळे, प्रशांत गायकवाड, दीपक पवार, बाबाजी तरटे, संभाजीराव रोहकले, सुवर्णाताई धाडगे उपस्थित होते.
अपशब्द वापरणाऱ्यास धडा शिकवा
येथील आमदारांनी वडनेरमध्ये मराठी बांधवांना भडवा या अशोभनीय शब्दाचा वापर करून अपमान केला. तो अधिकार त्यांना दिला कोणी ? सोशल मीडियावर एका कार्यकर्त्याने ही पोस्ट टाकली असता त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यात जर हिम्मत असेल तर स्थानिक आमदारांनी माझ्यावर गुन्हे दाखल करून दाखवावेत, आसा घणाघात संजीव भोर यांनी केला.