मुंबई – आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, येत्या तीन – चार दिवसात त्यांना आराम मिळेल, असेही अजित पवार म्हणाले.
रुग्णालयातील चर्चे दरम्यान उद्या (दि. 14 एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने केली आहे. याबद्दल चर्चा करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘धनंजय तू आधी बरा हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून यशस्वी करू;’ असा स्नेहाचा सल्लाही धनंजय मुंडे यांना दिला.
दरम्यान, काल सायंकाळी धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही विचारपूस करत माध्यमांना मुंडेंच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. काळजी करण्यासारखे काही नाही, असे राजेश टोपे म्हणाले होते.