नवी दिल्ली – उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते पुष्करसिंह धामी उद्या (बुधवार) शपथ घेणार आहेत. तर, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते प्रमोद सावंत यांचा 28 मार्चला शपथविधी होईल. धामी आणि सावंत सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भुषवणार आहेत.
देशातील पाच राज्यांत नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्या राज्यांपैकी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता होती. त्या चारही राज्यांची सत्ता राखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर पक्षाने संबंधित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची फेरनिवड केली. आता त्यांच्या शपथविधी सोहळ्यांसाठीची लगबग सुरू झाली आहे.
धामी उद्या दुपारी डेहराडूनमधील सोहळ्यात शपथ घेणार आहेत. तर, सावंत यांचा शपथविधी सोमवारी सकाळी पणजी नजीक होईल. दोन्ही सोहळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. तर, गोव्यात भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपला सरकार स्थापनेसाठी 2 आमदार असणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आणि 3 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे.