पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह आणि घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ, तसेच गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका २० वर्षीय तरुणीने पर्वती पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विश्वास राजेंद्र ताकतोडे (२५), सासरे राजेंद्र माणिकराव ताकतोडे (६०), दीर ओंकार राजेंद्र ताकतोडे (२२) सासू महानंदा ताकतोडे (५०), नणंद विद्या कांबळे (२५, सर्व रा. सिंहगड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास ताकतोडे याने तरुणी अल्पवयीन असताना तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी विवाह करणार आहे, असे सांगून २०१९ मध्ये येरवडा भागातील घरातून तरुणीला फूस लावून पळवून नेले. त्या वेळी तरुणी १६ वर्षांची हाेती. विश्वासने तिच्याशी विवाह केला त्या वेळी त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. तरुणीच्या आईचे घर येरवडा भागात आहे.
घर नावावर करून देण्यासाठी तिचा छळ केला, तसेच पती, सासरा, दिराने मारहाण केल्याने गर्भपात झाला. तिला जाळून मारण्याचीही धमकी देण्यात आली, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. टी. कांबळे तपास करत आहेत.