वाराणसी – तुम्ही आगामी काळात देवदर्शनासाठी वाराणसीला जाऊ इच्छित असाल तर आधी सोयीसुविधांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण दसरा-दिवाळी या सणांच्या काळात येथील हॉटेल्स फुल्ल राहतात. देव दिवाळीसारख्या दिवशी तर गंगेतील नावा आणि मोठ्या नौकांची भाडी लाखांच्या वर पोचलेली असतात.
नवरात्रीपासून वाराणसीमध्ये पर्यटक आणि भाविकांचे जथ्थे यायला सुरुवता होते. सध्या गंगेतील पूर कमी झाल्याने नौकांची वाहतूकही सुरू झालेली आहे. पूर उतरल्यामुळे गंगा आरतीला उपस्थित राहणारे आणि गंगा नदीच्या पात्रात नौका विहार करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.
देव दिवाळीसाठी छोट्या नावा आणि मोठ्या नौकांचे बुकींग आत्तापासून सुरू झालेले आहे. काही दिवसांतच सगळ्या हॉटेल्समधील बुकींग फुल्ल होतील. सध्या वाराणसीत लख्खा मेला सुरू झालेला आहे. आता करोनानंतर प्रथमच नवरात्र, विजयादशमी, दिवाळी, छटपूजा, देव दिवाळी, नागनथैय्या आदी उत्सव उत्साहात होतील.
त्यामुळे वाराणसीत पर्यटकांचे आगमन सुरू झालेले आहे. अशा स्थितीत तुम्हीदेखील वाराणसीला जाण्याची तयारी करत असाल तर लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सणांच्या काळात याठिकाणी पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे नियोजन न करताच गेल्यास हॉटेल, धर्माशाळेत किंवा गेस्टहाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकणार नाही. त्यामुळे येण्याच्या आधीच राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सध्या पूरस्थितीमुळे गंगेत नौकाविहारावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
गंगा आरतीला देखील पुरामुळे फार गर्दी नसते. मात्र सणांचे दिवस सुरू झाले की, भाविकांची संख्या वाढू लागते. देव दिवाळीला तर गंगा घाटांवर प्रचंड गर्दी होऊन माणसांचेच ट्रॅफिक जॅम होते. अशावेळी अनेकदा गर्दीतून वाट काढताना ट्रेन किंवा विमान चुकल्याच्या घटनाही घडतात. नदीतही नौकांची संख्या वाढून जल वाहतूक वाढते. देव दिवाळीच्या वेळी गंगाविहारासाठीचे भाडे प्रचंड वाढलेले असते.
यावर्षीचे पर्यटकांसाठीचे विशेष आकर्षण म्हणजे गंगेकाठावरील विस्तीर्ण वाळूमध्ये अहमदाबादच्या दोन कंपन्या टेंट सिटी उभारणार आहेत. निविदांद्वारे त्याची जबाबदारी प्रेवेज कम्युनिकेशन्स आणि मेसर्स लल्लूजी अँड सन्स या कंपन्यांना देण्यात आलेली आहे. प्रेवेज कंपनी 400 तंबू तर लल्लूजी अँड सन्स 200 तंबू उभारणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी वाराणसी विकास प्राधिकरणाद्वारे टेंट सिटीमध्ये वीज आणि पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांसाठी ही टेंट सुविधा उपलब्ध असणार आहे. टेंटसिटीमध्ये गेमिंग झोन, रेस्टॉरंट, डायनिंग एरिया, योग केंद्र, ग्रंथालय, आर्ट गॅलरी, वॉटर स्पोर्टस्, कॅमल आणि हॉर्स रायडिंग अशा सुविधा असणार आहेत. अडीचशे एकर जागेत ही टेंट सिटी उभारली जाणार आहे.