सातारा – सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांनी विविध उपक्रम राबवत दुर्गादेवीची उत्साही वातावरणात प्रतिष्ठापना केली. अभूतपूर्व उत्साहात सर्वत्र भक्ती- शक्तीचा जागर सुरु झाला असून करोनानंतर मोठ्या उत्साही वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.
करोनामुळे सण- उत्सवांवर घालण्यात आलेले निर्बंध सरकारने उठवल्याने आता सण उत्सव धुमधडाक्यात साजरे होत आहेत. गणेशोत्सवानंतर मोठ्या उत्साही वातावरणात घरोघरी दुर्गादेवीच्या आगमन झाले. घटस्थापनेने दुर्गादेवीची प्राणप्रतिष्ठापना झाली असून सातारा शहरात दुपारपासूनच दुर्गादेवीची वाजत गाजत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून दुर्गादेवी मंडळांना दुर्गादेवीच्या आगमनाची उत्सुकता लागली होती. शहरातील मंडळांनी आकर्षक अशी सजावट करत विद्युत रोषणाई केली आहे. सोमवारी मोठ्या उत्साही वातावरणात वाजत गाजत दुर्गादेवीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त मंडळांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.