नागपूर – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येत्या एका वर्षात राज्यातील 75,000 तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या दीड वर्षाच्या काळात 10 लाख युवकांना नोकऱ्या देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी जूनमध्ये विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात 10 लाख लोकांची मिशन मोड वर भरती करण्यास सांगितले होते.फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या उपक्रमासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने राज्यातील 75 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
या 75,000 नोकऱ्यांपैकी 18,000 नोकऱ्या पोलिस खात्यात असतील आणि येत्या पाच ते सात दिवसांत त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे ते म्हणाले.अन्य विभागातील जागाही लवकरच भरल्या जातील असे ते म्हणाले.