हर्षवर्धन पाटलांना पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्रात उतरवणार – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचा इंदापुरात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद

रेडा – येत्या काळामध्ये निश्‍चित भाजपचे सरकार राज्यामध्ये येईल. ईश्‍वराचा संकेत आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपमय करा. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय केल्याशिवाय राहणार नाही. हर्षवर्धन पाटील तुम्ही पुणे जिल्ह्यापुरते नेते नाहीत. पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रात आमच्यासोबत तुम्हाला मैदानात उतरावे लागेल. कारण तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वक्‍तव्यावरून फडणवीस यांनी पाटील यांना भावी वाटचालीचे संकेत दिले आहेत.

इंदापूर येथील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवास्थानी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब भेगडे, आमदार राहुल कुल, पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, हर्षवर्धन तालुका कमी पडलेला नाही. फार तुम्ही चांगली मते घेतली आहेत. परंतु कधीकधी आपल्या मार्गामध्ये चालत असताना अपघात होतात. तसा तुमचाही झाला आहे. माझाही झाला आहे. त्यामुळे अपघातामुळे आपण दोघेही थोडे मागे राहिलो आहोत. पण काळजी करण्याचे कारण नाही. आपल्याला फार काळ कोण मागे ठेवणार नाही. इंदापूर तालुक्‍यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी मोठी लढत दिली आहे. फक्‍त पंधराशे ते सोळाशे मते इकडे – तिकडे झाली तर निकाल वेगळा लागला असता. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी काळजी करायची गरज नाही.

हर्षवर्धन यांना प्रचंड अनुभव आहे. त्यांच्यासारखा प्रचंड अनुभव असणारा नेता भाजपला मिळाल्यामुळे या अनुभवाचा उपयोग करूनच घेऊ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते व हर्षवर्धन पाटील हे दोन्ही अनुभवी नेते आमच्यासोबत असल्यामुळे भविष्याची चिंता वाटत नाही. राज्यातील सत्ता फार काळ चालणार नाही, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

विश्‍वास टाकला, परंतु आम्ही कमी पडलो
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्यांमध्ये भाजपचे सरकार बनवण्यासाठी अपयश आले. तसेच इंदापूर तालुका कमी पडल्याचे शल्य आम्हाला आहे. फडणवीस यांनी आमच्यावर विश्‍वास टाकला. परंतु आम्ही कमी पडलो. त्यामुळे दिलगिरी व्यक्‍त करतो. राजकारणात हार- जीत असते. परंतु इंदापूर तालुका स्वाभिमानी आहे. मी पराभवाला घाबरणारा नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, येणारा पुढचा काळ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगला जाईल, असाही विश्‍वास पाटील यांनी व्यक्‍त केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.