देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

मुंबई – राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ला म्हणजे भाजप सरकारच्या नक्षलवाद व दहशतवादाविरोधातील मवाळ भूमिकेचाच हा परिणाम असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही. नक्षलवाद्यांनी एवढा मोठा हल्ला करेपर्यंत गृहविभाग काय करत होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत, त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. या हल्ल्‌यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.

केंद्रातील मोदी सरकार असो वा राज्यातील फडणवीस सरकार, दोन्हीही फक्त मोठ-मोठ्या गप्पा मारण्यातच पटाईत आहेत. या सरकारच्या काळात देशात अतिरेकी व नक्षलवाद्यांचे हल्ले वाढले. पण भाजपाला त्याचे काहीही पडलेले नाही.

फक्त प्रचारसभेतच घरात घुसुन मारण्याच्या फुशारक्‍या मारण्यात भाजपवाले पटाईत आहेत. नोटाबंदीने नक्षलवाद व दहशवादाचा बिमोड होणार असल्याचा दावाही यांनीच केला होता, पण त्याचाही काही परिणाम झालेला दिसत नाही. भाजप सरकारची दहशतवादाविरोधात काही ठोस भूमिका नाही. त्यामुळेच या सरकारच्या काळात दहशतवाद्यांचे व नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे, अशी टीका खासदार चव्हाण यांनी केली.

गडचिरोलीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात कॉंग्रेस पक्ष सहभागी असल्याचेही चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)