पंतप्रधानांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई – देशातील करोना लसीकरण मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठ्या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयानुसार आता देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकारतर्फे मोफत करण्यात येणार आहे. यापूर्वी, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवण्यात आली होती.

पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर भाजपच्या नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सर्वांसाठी मोफत लसीकरणाच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच या निर्णयामुळे देशातील लसीकरण मोहिमेस गती प्राप्त होईल असं देखील ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी, “राज्य सरकारांनी केलेल्या आग्रहामुळेच केंद्र सरकारतर्फे राज्यांना २५ टक्के लसी खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र नंतर राज्य सरकारांनी स्वतःच लसींबाबतची जुनी प्रणाली कार्यान्वित करावी अशी मागणी केली. यामुळेच केंद्र सरकारने पुन्हा संपूर्ण लसीकरणाची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे.” अशी भूमिका मांडली.

“या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्यास मदत होईल. यापुढे लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याने राज्यांना व नागरिकांना मिळणाऱ्या लसी या केंद्रातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार.” असंही फडणवीस म्हणाले.

तसेच पंतप्रधानांनी, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिल्याबाबतही फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यामुळेच हा निर्णय झाल्याचे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.    

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.