पुणे – राज्यातील उदयोन्मुख क्रीडापटूंमधून ऑलिम्पिक, राष्ट्रकूल व अन्य क्रीडा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा मार्गदर्शकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यासाठी 153 क्रीडा मार्गदर्शक मानधनावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणीनिहाय पदे मानधन तत्वावरे निर्माण करण्याचा निर्णय 15 जुलै 2010 रोजी घेण्यात आला.
मात्र या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावयाची झाल्यास क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीस अडचणी निर्माण होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे नियमावलीत बदल करण्यात आले. विशेषत: बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे नियुक्त केल्या जाणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध होत नव्हते. यासाठी भारतीय खेळ प्राधिकरणातील धर्तीवर राज्यात क्रीडा मार्गदर्शक देण्यात येणार आहेत.
त्यानुसार राज्यात 153 क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यात 53 क्रीडा मार्गदर्शकांच्या दरमहा 60 हजार रुपये प्रतिमाह, तर 100 सहायक क्रीडा मार्गदर्शकांच्या दरमहा 40 हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्त्या होणार आहेत. मानधनावर पदे भरण्यासाठी शासनाकडून सुधारित निययावली लागू होणार आहे, असे सांगण्यात आले.