पुणे -विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात जी-20 परिषदेचा दुसरा टप्पा होत आहे. या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळकरी विद्यार्थी इतके रमले, की तेथे त्यांच्या प्रत्येक प्रश्न-समस्यांची उकल होत होती. बुद्धीला चालना मिळेल, असे काही तरी नावीन्यपूर्ण पाहण्यास मिळत होते.
या प्रदर्शनात पुस्तके, हसत-खेळत शिक्षण देणारी खेळणी, इलेक्ट्रॉनिक साधने, उपकरणे, विविध खेळ, व्यायामासोबत ज्ञान, हस्तकला, विविध अभ्यासक्रम आणि कौशल्याची माहिती घेताना होणारा आनंद आणि रोबोटसोबत मज्जा आणि ड्रोनची करामत, शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देताना जणू शालेय विद्यार्थ्यांनी मुक्त शाळेतील मनसोक्त आनंदाचा अनुभव घेतला.
या प्रदर्शनाला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी भेट देऊन माहिती घेतली. प्रदर्शनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयटी मुंबई, मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, एनसीईआरटी, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, सिंबायोसिस, राष्ट्रीय बालभवन अशा संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणाच्या संधीविषयी माहिती देण्यात येत आहे. “एनसीईआरटी’ने विविध कौशल्याची माहिती पुस्तके, खेळणी आणि प्रतिरुपांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, ई-लर्निंग, रोबोटिक्स, विज्डम वॉल, फोटो मेमरी, विज्ञानाधारीत मॉडेल्स अशा नावीन्यपूर्ण विषयांची माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्साहाने दिली. काही विद्यार्थी माहितीवर आधारित टिपण घेत होते. यावेळी उत्तराखंड, मिझोरम, आसाम अशा दालनात प्रदर्शित त्या-त्या राज्याच्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही घेतली. नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेणारे विद्यार्थी हस्तकलेविषयी तेवढ्याच उत्सुकतेने विविध राज्याच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारत होते.
विविध भारतीय भाषांचे ज्ञान आणि हस्तलिखिते
प्राचीन भारतीय ज्ञानाचे विविध दाखले, लोप पावलेल्या काही भारतीय भाषा, नेपाळी भाषा आणि देवनागरी लिपी यांच्यातील साम्य, पुराणातील श्लोक लिहिण्यासाठीचे नैसर्गिक पद्धतीचे कागद, महान शल्यचिकित्सक आचार्य सुश्रूत यांनी वापरलेल्या शल्यशास्त्रातील साहित्यांच्या प्रतिकृती इत्यादी ज्ञानवर्धक वस्तूंचा संग्रहदेखील विद्यार्थी कुतूहलाने पाहत होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.