पिंपरी,(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीसाठी महापालिकेकडून मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे. पुणे महानगर परिवहन लिमिटेडच्या निगडी डेपो येथील शेकडो वाहनचालक, वाहक यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची शपथ घेतली. 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार केला
. निगडी येथील बस डेपो येथे आगार व्यवस्थापक यशवंत हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहनचालक, वाहक यांनी मतदानाची शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार केला.
यावेळी मतदान जनजागृती पर मार्गदर्शन करताना नोडल अधिकारी कोळप बोलत होते. या कार्यक्रमास पिंपरी डेपोचे व्यवस्थापक भास्कर दहातोंडे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मण कावळे तसेच डेपो कर्मचारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत 100 टक्के मतदान करण्याच्या दृष्टीने सर्व वाहन चालक, वाहक यांनी स्वत: मतदान करावे. शिवाय वाहक, कर्मचा-यांनी शहरातील विविध मार्गावर धावत असताना बसमधील प्रवाशांनाही मतदान करण्यासाठी सौजन्यपणे विनंती करून लोकशाही प्रती आपले कर्तव्य बजाविण्याचे आवाहन करावे, असे मावळ लोकसभा मतदारसंघाचे तसेच 206 पिंपरी विधासभेचे नोडल अधिकारी तथा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप यांनी केले.
निगडी बस डेपो व्यवस्थापक यशवंत हिंगे यांनी डेपोच्या सर्व कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याच्या सूचना दिल्या. तसेच लोकशाही प्रतिष्ठा ठेवून मतदानाचे महत्त्वाचे योगदान सर्वांनी पार पाडावे, असे आवाहनही केले. महापालिकेच्या वतीने मतदान शपथचे वाचन करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवासात जाता – येता तसेच जवळच्या मित्रमंडळी तसेच सोशल मिडीयावर देखील मतदान करण्याचा प्रचार, प्रसार करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने या वेळी करण्यात आले.