पिंपरी – श्रीक्षेत्र देहूगाव येथे शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात आयोजकांकडून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इशारा केला तरी देखील निवेदकाने अजित पवार यांचे नाव न घेतल्याने पंतप्रधान भाषणासाठी उठले.
शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात राजशिष्टाचारानुसार उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची आधी संधी देणे अपेक्षित होते. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर संत चोखामेळा यांच्या कुटुंबीयांच्या अभंग गाथेचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने भाषणासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. त्या वेळी उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी न दिल्याचे पंतप्रधानांच्या लक्षात आले. तेव्हा खुद्द पंतप्रधानांनी निवेदकाकडे पाहून अजित पवार यांना आधी बोलू द्या असा, इशारा केला. परंतु निवेदकाने त्यांचे नाव न घेतल्याने अखेर मोदींनी भाषणास सुरुवात केली. आयोजकांकडून उपमुख्यमंत्र्यांना डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.