पुणे -श्रीक्षेत्र सुदुंबरे (ता. मावळ) येथील श्री संताजी महाराजांची समाधी मंदिरापासून ज्येष्ठ वद्य सप्तमी शके 1945 शनिवार (दि. 10) रोजी दुपारी 4 वाजेनंतर महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान होणार आहे.
सुदुंबरे येथील विठ्ठल मंदिरामध्ये त्या दिवशी पालखी मुक्कामी राहून रविवार (दि. 11) श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर देहूपासून चिंचवड मुक्कामी मार्गस्थ होणार आहे.
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी आढावा घेण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांची बैठक भवानी पेठ, पुणे येथे पार पडली. यावर्षी पालखी रथासाठी हभप छबन महादेव कुदळे (रा. यवत, ता. दौंड) यांच्या बैलजोडीची निवड केली आहे. विनोद लोखंडे यांचा अश्व पालखी सोहळ्याच्या अग्रभागी राहणार आहे.
सोमवार-मंगळवार (दि. 12, 13) पुण्यामध्ये मुक्काम करून हा सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरपर्यंत मार्गस्थ होणार आहे. एकूण सात वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या दिंड्यांमध्ये तीन हजार भाविक सहभागी होतात. यावेळी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नारायण क्षीरसागर, उपाध्यक्ष गंगाधर हडके, सचिव अरविंद रत्नपारखी, खजिनदार मनोहर जाधव, माजी अध्यक्ष अरुण काळे, माजी सचिव ताराचंद देवराय, हभप बाळकृष्ण वाळुंजकर, शंकर काळे, जयश्री राऊत आणि प्रदीप वाव्हळ यांसह इतर विश्वस्तांच्या सहकार्यातून या सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे.
यंदा पाऊस उशिरा असल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबरोबरच आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी सरकारकडून सहकार्य मिळावे, असे सोहळ्याचे सचिव अरविंद रत्नपारखी यांनी सांगितले आहे.