पुणे -यंदाच्या एप्रिलमध्ये कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगावशेरी आणि चिंचवडमध्ये कमालीची तापमानवाढ नोंदवली गेली. येत्या काळांतही या भागांना तापमानवाढीचा धोका कायम आहे. विशेषत: या भागांतील भौगोलिक परिस्थितीवर मानवी हस्तक्षेप हे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे.
यंदा एप्रिलच्या मध्यापासूनच शहराच्या अन्य परिसरांच्या तुलनेत या भागांतील तापमान दररोज सरासरी 4-5 अंशांनी अधिकच राहिले. दरम्यान, या भागांत “शहरी उष्णतेचे बेट’ अर्थात अर्बन हीट आयलॅंड तयार झाले आहे का, याचा प्रदीर्घ अभ्यास पुणे हवामानशास्त्र विभाग आणि आयआयटीएम यांच्या विद्यमाने केला जात आहे. येथील शास्त्रज्ञांनी याबाबत काही निरीक्षणे मांडली आहेत. उदा. या परिसरांतील मोठमोठ्या कार्यालयांत ए.सी. अर्थात वातानूकुलित यंत्रणांचा बेसुमार वापर, हवा खेळती राहण्यासाठी जागाच शिल्लक नसणे, सतत वाहतूक कोंडी, उष्णता शोषण्यासाठी माती किंवा मोकळी जागा उपलब्ध नसणे, अशी कारणे समोर येत आहेत. अर्थात ही निरीक्षणे प्राथमिक असली, तरी ती दूरगामी परिणाम करणारी असणार आहेत.
याबाबत शास्त्रज्ञांनीही अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “पुण्यातील ठराविक भागांमध्ये “शहरी उष्णतेचे बेट’ तयार होत आहे का, याचा अभ्यास आमच्या पातळीवर सुरू आहे. याबाबत स्थानिक प्रशासनांच्या उच्च अधिकारी वर्गास आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत. पुण्यात भविष्यात तामपानवाढीचा धोका कायम आहे. याबाबत उपाययोजनांबाबतही चर्चा केली जात आहे.’
दर उन्हाळ्यात पुण्याचे सरासरी तापमान 38-40 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. पुणे जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहिली असता, ज्यामध्ये टेकड्या, जंगले, जलाशय, शहरे आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. फक्त पुण्यातील ठराविक परिसर नव्हे तर शिरुर, तळेगाव ढमढेरे, राजगुरूनगर, इंदापूर या भागांचे तापमान यंदा उच्चांकी नोंदवले गेले आहे.
“शहरी उष्णता बेट’ म्हणजे काय?
“शहरी उष्णता बेट’ (अर्बन हिट आयलॅंड) म्हणजे शहरातील काही भागांमध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत आढळते. ही तफावत प्रामुख्याने रात्री अधिक जाणवते. कारण इमारती, रस्ते, पदपथांनी शोषून घेतलेली उष्णता सूर्य मावळल्यानंतरही कायम राहून रात्रीही अधिक तापमान जाणवते. हा घटक सामान्यत: दिवसाच्या तापमानापेक्षा रात्रीच्या तापमानाशी संबंधित असतो. परिसरातील लोकसंख्येची घनता, वाहतूक कोंडी, मोठ्या प्रमाणावर बांधकामे, कार्बन उत्सर्जन आणि कॉंक्रीटीकरण यासारख्या घटकांमुळे तापमान वाढू शकते, असे साधारण गृहितक मांडले जाते.