पर्यावरण अहवालातील माहिती
पुणे – शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षभरात वाढ झाली असून, मलेरियाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही शेकड्यावर असल्याचे पर्यावरण अहवालातून दिसून येत आहे.
सन 2019-20 चा पर्यावरण अहवाल महापालिका मुख्यसभेत नुकताच सादर करण्यात आला. त्यामध्ये कीटकांपासून होणाऱ्या रोगांमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि करोना आजारासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
सन 2013 मध्ये डेंग्यूने थैमान घातले होते. त्यानंतर 2015 मध्ये याच्या बाधितांमध्ये घट दिसून आली. मात्र, पुन्हा 2016 मध्ये या रोगाने आणखी डोके वर काढले. 2019 मध्ये या रुग्णांची संख्या 1,407 झाली होती. सन 2013 -14 मध्ये मलेरिया बाधितांची आकडेवारी शेकड्यावर होती. त्यानंतर ही संख्या कमी झाली आणि 2019 मध्ये ती शून्यावर आली आहे.
सन 2016 मध्ये चिकनगुनियाचे 2481 रुग्ण होते; तर ती 2017-18 या वर्षांत कमी झाली. सन 2019 मध्ये मात्र 2018 च्या तुलनेत बाधितांची संख्या सुमारे पाचशेने जास्त म्हणजे 741 होती.