बंगळुरू : सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात बंगळूरमध्ये सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का आणि एनआरसीच्या बाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचा आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही निदर्शने करण्यात आली.
का आणि एनआरसीच्या विरोधात बंगळुरातील मिलर्स रस्ता येथे ही निदर्शने करण्यात आली. तब्बल 10 हजार निदर्शक जमा झाले होते. नागरिक इदगाह मैदानावरही एकत्र आले होते. रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ काही जण रस्त्यावर आले होते तर सोमवारी काही हजार जण या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहराने अनुभवले. ही निदर्शने 35 डाव्या आणि मुस्लीम संघटनांनी आयोजित केली होती.
बंगळुरूचे पोलिस आयुक्त भास्कर राव म्हणाले, का कायद्या विरोधात निदर्शना कोणतीही बंदी नाही. शहरात जमावबंदी लागू नाही. यापुर्वी शनिावरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली होती.