लोकशाही वरदानच…

अब्दुल कलामांचे ते वाक्‍य आजही माझ्या कानात निनादते आहेत. आपल्या तरुणाईने प्रगती साधण्यासाठी भव्य कार्य डोळ्यासमोर ठेवावे, ते पूर्ण करण्यासाठी झटावे आणि देशाचे चित्र बदलावे, त्यांची मने प्रेरित करूनच आपल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करता येईल. एकंदरीत, खूप सारी आव्हाने घेऊन भारत वर्तमानातून मार्गक्रमण करीत आहे.

रुपयाची घसरण, शेअर-बाजार, दुष्काळ आणि भ्रष्टाचार,पाकिस्तानचा हल्ला, चीनची दादागिरी, गरिबी आणि बेरोजगारी नेहमीचीच. एक तरुण म्हणून समजते आम्हाला जाणीवही आहे. खरे तर राजकीय परंपरेचे उत्तम उदाहरण आपला भारत देश आहे. मात्र, जुनाट आणि बुरसटलेली विचारधारा असलेले राजकारण आजही चालू आहे. हे दुर्दैव!.

भ्रष्टाचारामुळे बेईमान झालेले, थोरलेपणाची जाण विसरलेले आजचे राजकारणी आणि त्यांच्या चांगल्या अनुभवांना मुकलेली जिंदादिल धडपडणारी तरुण पिढी असा केविलवाणा भारत झाला आहे यामुळे महासत्तेची स्वप्ने बघणारा भारत अजून गर्भाशयातच आहे असे कधी कधी वाटते. राजकारणात मुरलेली खूप जुनी पिढी आजही कार्यरत आहे, पण समस्यांच्या गोवर्धन पर्वताला त्यांनी अजूनही हात लावलेला नाही. आजचा जो भारत आहे, तो इथल्या लोकांच्या कष्टांमुळे. याला पवित्र राजकारणाची जोड मिळाली असती तरी भारत त्रिलोकाधीपती झाला असता. यासंदर्भात तरुणांकडे मोठ्या आशेने बघितले जाते. कशासाठी? परिवर्तनासाठी? होय परीवार्तानासाठीच. जगाच्या इतिहासात कुठल्याही क्रांतीला तरुणांनीच बळ आणि वेग दिला आहे. टिळक युगाच्या अस्ताच्या वेळी संपूर्ण भारत प्रतीशोधाच्या अग्नीत धगधगत होता, त्यावेळी तरुणांनीच सर्व भारताचे लक्ष वेधले होते. तेव्हा कुठे भारताच्या स्वातंत्र्याचे लक्ष पुसटसे दिसायला लागले होते. या सगळ्या गोष्टी खटकणारा एक मोठा समाजप्रवाह आहे तो म्हणजे तरुण.

एका-एका मिनिटाची अपडेट घेण्यासाठी धडपडणारा तरुण चौकस आहे. त्याच्या विचारकक्षा रुंदावलेल्या आहेत. आपल्या देशाची समाजव्यवस्था बघता, एका रातीत कायापालट होणे शक्‍य नाही. पण प्रामाणिक प्रयत्न तर करावेच लागतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आपण सर्व भारतीय उत्तम समर्थक होतो,आणि आहोतच, खरेतर देशाची व्यवस्था गडबडलीय, आणि बदल घडवण्यासाठी लोक आतुर आहेत, मात्र व्यवस्था कशाप्रकारची असावी याची पक्‍की योजना कुणाकडेच नाही मात्र आतापर्यंत आजमवलेल्या सर्व व्यवस्थात हीच व्यवस्था श्रेष्ठ आहे. लोकशाही! लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हे, लोकशाहीचे तत्व आपल्या सर्व आयुष्यात संस्कृतीत विचारांत भिनते ती खरी लोकशाही. वर्तमान परिस्थितीत शासनाच्या व्यवस्थेत पारदर्शकता तरुण चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकतो. काही मूलभूत विचार तरुणांनी राजकारणी म्हणून केल्यास कुठल्या वेळी काय भूमिका घ्यावी. कुठल्या प्रश्‍नावर किती प्रमाणात कुणाला समर्थन द्यावे. याविषयीचा गोंधळ कमी होईल. लोकशाही,परिवर्तन प्रगती या गोष्टी सामान्य माणसासाठीच असतात, किंबहुना असायला हव्यात. असा विश्‍वास इथल्या तरुणांना आहे. समाजाचे सांस्कृतिक व बौद्धिक आरोग्य सुदृढ ठेवण्याची कुवत आपल्यामध्ये आहे.तरुणांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल अनेक विचार मांडले जातात.

फ्रेंच तत्त्ववेत्ता व्होल्टेअरने म्हटले आहे तुमच्यावर कोण राज्य करतय? हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही कोणावर टीका करू शकत नाही, ते आधी समजून घ्या. आताची आमची तरुण पिढी सुज्ञ आहे. तरुण सरसावतोय पुढे. स्वातंत्र्याची नक्‍की कल्पना तसेच स्वर्णिम भारताची स्वप्ने पहिली आहेत त्याने, परिवर्तन घडवण्यासाठी सर्वार्थाने तयारीला लागलाय तो. कळवळते हृदय त्याचे देशाची अवस्था बघून. इतिहासातील नोंदी जवळ ठेवतो तो. लाथ मारील तिथे पाणी काढील, असा त्वेष आहे त्याच्यात. सद्‌सद्विवेक बुद्धी जागृत आहे त्याची. गरज आहे त्याच्या पुढाकाराची आणि धैर्याची, आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची; ज्येष्ठांचा बौद्धिक, माहिती तंत्रज्ञान विषयक न्यूनगंड नाहीसा व्हावा, तरुण आणि ज्येष्ठ यांच्यातील ध्येय, दूरदृष्टी, आकांक्षा. महत्त्वाकांक्षा यातील सीमारेषा स्पष्ट व्हाव्यात. म्हणजेच देशाची जीवनशैली संपन्न व्हावी असा आशावाद व्यक्‍त करतो. राजकीय क्षेत्रात तरुणांचा सहभाग वाढायला हवा, मोठ्यांनी त्यांना बाजू द्यावी, याद्वारे लोकशाही मजबूत होईल. तरुणांचा हस्तक्षेप हाच जागृत आणि जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. असे होण्यासाठी विशिष्ठ राजकीय विचारधारा, राजकीय संस्कृती लागते ती आपल्या भारत देशात कित्येक शतकांपासून नांदत आहे.

– भगवान केशव गावित

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.