पुणे(प्रतिनिधी) – तहसीलदाराकडून काम करून देतो, असे सांगत एका नागरीकाकडे सहा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. तर आणखी एकावर गुन्हा दाखल आहे. दरम्यान अटक केलेल्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.
राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा.फुरसुंगी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मोरेसह गुंजाळ नावाच्या व्यक्तीविरुद्ध (पुर्ण नाव माहित नाही) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रेमकुमार आगरवाल यांनी बाजू मांडली. तर, बचाव पक्षातर्फे अॅड. पुष्कर दुर्गे यांनी विरोध केला.
तक्रारदार यांची फुरसुंगी गावात जमीन आहे. त्यांच्या जमीनीवरील इनामी शेरा रद्द करण्याचे प्रकरण तहसील हवेली कार्यालय येथे प्रलंबीत आहे. दरम्यान, जमीन करेदी आणि विक्रीशी संबंधीत व्यवहाराची व महसुल विभागाशी संबंधीत कागदपत्रे मिळवून देण्याचे काम मोरे व गुंजाळ करतो. संशयित आरोपींनी तक्रारदाराशी संपर्क वाढविला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वैयक्तीक प्रभावाचा वापर करुन लोकसेवक तहसीलदार हवेली यांच्याकडून काम करुन देतो, असे सांगून जमीनीवरील इनामी शेरा रद्द करण्यासाठी नोंद घेण्याबाबतचे पत्र तक्रारदाराला मिळवून दिले. त्यानंतर त्यांच्याकडे सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी “एसीबी’कडे तक्रार केली. त्यानंतर 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये “एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पडताळणी केली, त्यानंतर बुधवारी याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत.
याविषयी पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील म्हणाले, या प्रकरणाशी अन्य कोणाचा संबंध आहे का ? याची पडताळणी करण्यात आली. मात्र अन्य कोणाचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार मोरे याला अटक करण्यात आली. चार महिने विलंबाने गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्ष त्याने रक्कम स्विकारली नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे अॅड. पुष्कर दुर्गे यांनी केला.