वाघोली : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या व बीजेएस कोविड केअर सेंटरमधील लसीकरण केंद्रावर वाढती गर्दी लक्षात घेता वाघोलीत दुसरे लसीकरण सुरु करावे अशी मागणी वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, वाघोलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत बरेच गावे व मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा भाग जोडला गेला असल्यामुळे आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. तसेच लसीकरण केंद्र एकाच असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. लसीकरण केंद्र ग्रामपंचायत हॉल किंवा अन्य ठिकाणी चालू केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
वाघोलीत आत्तापर्यंत १५८४० जणांचे लसीकरण
वाघोली येथील बीजेएस कोविड केअर सेंटरमध्ये आत्तापर्यंत १५८४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी, जेष्ठ नागरिक व इतर नागरिकांचा समावेश आहे. याठिकाणी नियमित लसीकरण सुरु असले तरी लसीकरणासाठी आवश्यक डोस काही वेळा कमी पडत आहेत. वाघोलीतील वाढती रुग्णसंख्या पाहता याठिकाणी लसींचा पुरवठा वाढला गेला पाहिजे.