भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश कुटे यांची माहिती
वाघोली : कोरोना संसर्गजन्य महामारीची दुसरी लाट तीव्र स्वरुपाची असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. असंख्य रुग्णांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. रुग्णांच्या निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मदत कार्यासाठी हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे. रुग्णांनी मदतीसाठी हेल्प लाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश कुटे व भारतीय जनता पार्टीचे हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील यांनी केले आहे.
सद्यस्थितीत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे खाजगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालये व कोविड केअर सेंटर अपुरे पडत आहेत. असंख्य बाधित रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसाठी बेड, रेडेमीसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन आदि बाबीसाठी धावपळ करावी लागत आहे. अनेक अडचणींचा सामना करताना हतबल रुग्णांच्या मदतीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रुग्णांना लवकर मदत मिळावी या उद्देशाने हेल्प लाईनची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असणाऱ्यांनी हेल्प लाईन नंबरवर संपर्क केल्यास भाजपचा संबधित पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांकडून नाव, पत्ता आदि बाबींसह व्यवस्थित अडचण समजवून घेईल आणि लवकरच मदत केली जाणार असल्याचे भाजपचे गणेश बापू कुटे यांनी सांगितले.