मुंबई – आयपीएल स्पर्धेचा स्पेशालिस्ट मानला जात असलेल्या सुरेश रैना याला चेन्नई सुपर किंग्ज संघात पुन्हा एकदा स्थान देण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला सलग तीन सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला असून जो या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त यशस्वी ठरला आहे त्याच रैनाला संघात का घेतले गेले नाही. लिलावातही त्याला खरेदी केली नाही, तेच आता चेन्नई संघाला भोवत आहे, असे ताशेरेही चाहत्यांनी ओढले आहेत.
यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत चेन्नईने आपले तिनही सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा नवनियुक्त कर्णधार रवींद्र जडेजा याचे कर्णधारपद काढून घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महेंद्रसिंह धोनीने यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वीच नेतृत्व सोडले व जडेजाकडे ही जबाबदारी सोपवली होती.
सध्या जडेजा कर्णधार म्हणून यशस्वी होत नसला तरीही एक अष्टपैलु म्हणून यश मिळवत आहे. आता चेन्नई संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.